Saturday 19 January 2013

बळी शिक्षणाचा की शिक्षकांचा


महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचे भीषण किंबहुना दुर्दैवी चित्र नुकतेच 'असर' या संस्थेच्या सर्वेक्षणातून सर्वांच्या समोर आले. पाचवीतील विद्यार्थ्याला दुसरीचे पुस्तक देखील न वाचता येणे किंवा प्राथमिक स्तरावरील अंकमोड न करता येणे, हे विदारक सत्य या निमित्ताने सर्वांसमोर आले. आता हे सत्य कडू असले तरी सत्यच ते... त्यामुळे ते नाकारता येणे शक्यच नाही, कारण आपण डोळे मिटले म्हणजे रात्र झाली, असे होत नाही ना. यामुळेच आता, प्राथमिक स्तरावर शिक्षणाचा दर्जा खालावण्यास जबाबदार कोण ? विद्यार्थ्याला काही येत नाही, याला जबाबदार कोण ?  (विद्यार्थ्याच्या सोयीनुसार) बदलणारी शिक्षणपद्धती की शिक्षक या गोष्टींचा सर्व पातळींवर विचार करणे गरजेचे आहे.
आजची शिक्षणपद्धती मुळात 'विद्यार्थ्याच्या सोयीनुसार' बदलणारी आहे आणि हे देखील एक सत्यच आहे.  हे विधान देण्यामागची कारणे बरीच असली तरी त्यातील एक म्हणजे विद्यार्थ्याला वयानुरुप शैक्षणिक इयत्तेत प्रवेश देण्यात यावा आणि शिक्षकांनी अतिरिक्त वेळ खर्ची करुन सदर विद्यार्थ्याला पायाभूत ज्ञान द्यावे, असा सरकारी नियम आहे. याबाबत उदाहरण द्यायचे झाल्यास दहा वर्षाच्या विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरुप पाचवीच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येतो. मग वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तो शाळेची पायरी चढला असो किंवा नसो. परंतु या आदेशानुसार त्याला सदर इयत्तेत प्रवेश दिला जातो आणि जर तो त्यापुर्वी शाळेत गेला(च) नसेल तर त्याच्याकडुन चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम हा अतिरिक्त वेळ देऊन पूर्ण करवून घेतला जातो. मग अशा (तथाकथित साक्षर) विद्यार्थ्याला अभ्यासक्रम येणार तो कितीसा. दुसरे कारण असे की आठवीपर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात त्याला कोणत्याही इयत्तेत नापास करू नये (झाला ना विद्यार्थी बिनधास्त). मग शैक्षणिक इयत्तेतील काही येवो अगर न येवो, तुम मेरा कुछ नही बिघाड सकते', शिक्षकांच्या बाबतीत असाच काहीसा त्याचा आर्विभाव. सरकारचा हा अजुन एक नियम विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडला. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान प्राथमिक शिक्षण तरी आले(च) पाहिजे, हा सरकारचा त्यामागील (प्रामाणिक) हेतू. आणि या निर्णयामुळे विद्यार्थीदशेतील स्पर्धाच संपली (थोडक्यात हुशार किंवा प्रामाणिक विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्यायच हा). पास होण्यासाठी लागणारे मार्क मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत...लगेचच संपली. मग या नियमानुसार किंबहुना आदेशानुसार जर सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्णच करायचे आहे, तर परिक्षा तरी का घ्याव्यात (?).काय गरज आहे, अशा वरकरणी आणि दिखाऊ परिक्षांची. तिसरे कारण असे की, प्राथमिक इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक अथवा शारिरिक त्रास देऊ नये. साध्या सरळ शब्दात सांगायचे तर प्राथमिक शिक्षणाच्या कालावधीत त्याला शिक्षा करू नये. आता ही खऱ्या अर्थाने शिक्षा कोणाला (शिक्षकाला की विद्यार्थ्यांला). विद्यार्थ्याचे काही चुकले आणि त्याच्यावर ओरडण्याची किंवा हात उगारण्याची वेळ येते, तेव्हा नेमका हा नियम आड येतो. त्यामुळे 'छडी लागे छम छम, विद्या येई घमघम', हे गाणं तर विद्याथ्यांबरोबरच शिक्षकांसाठीही जवळपास इतिहासजमाच झाले आहे.
एकीकडे हे सर्व नियम विद्यार्थ्याच्या पचनी पडत राहतात तर दुसरीकडे शिक्षकांचीही कोंडी केली जाते. मुंबई महानगरपालिकेतील अनेक शाळांची जर आजची परिस्थिती पाहिली, तर केवळ दोन ते तीन शिक्षकांवर संपुर्ण शाळेचा भार पडलेला दिसतो. विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी इयत्ता मात्र तितक्याच सांभाळाव्या लागतात. दुष्काळात तेरावा महिन्याप्रमाणे ज्ञानार्जना बरोबरचे इतर कारकुनी कामे देखील त्यांच्या पदरी पडतात. याशिवाय निवडणुकांची कामे ही त्यांच्या पाचवीलाच पुजली आहेत तर आषाढी वारीप्रमाणे दर दहा वर्षांनी जणगणनाही त्यांच्या नशिबी येत राहते. इतर वेळेस म्हणायचे तर मिटींग्स, ट्रेनिंग हे असतातच... अशा या सर्व धकाधकीच्या दैनंदिन कामातून विद्यार्थ्याला शिकवण्याचे कामही करावे लागणाऱ्या शिक्षकाची किती तारांबळ उडत असेल... याची कल्पनाही न केलेली बरी. असे म्हणतात, 'विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि शिक्षक त्याला घडवण्याचे काम करत असतो', पण जर शिक्षकाला त्याला घडवण्यासाठी पुरेसा वेळच दिला नाही आणि वर सांगितल्याप्रमाणे अनेक सरकारी नियमांच्या मर्यादेत त्याला आणले, तर केवळ काम म्हणून तो मुर्ती घडवेल पण ती सुबक होईल का(?) हा विचार करणे आता जास्त महत्तवाचे ठरणार आहे. खूप मागे जायला नको पण किमान दहा वर्षापूर्वी जे शालेय जीवन होते, ते निश्चितपणे खुपच चांगले होते आणि कदाचित ती पिढी तरी भाग्यवान की दर्जेदार शिक्षण हे त्यांच्या वाट्याला आले. खरे पाहता, आजचा विद्यार्थी त्याला मुकतो आहे.
शिक्षणपद्धती म्हटली की, त्याचे महत्त्वाचे दोन घटक म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. परंतु आजची शिक्षणपद्धती बघता, विद्यार्थी आणि शिक्षणपद्धती या दोहोंच्यामध्ये शिक्षकच आता भरडला जाताना दिसतोय. सर्वेक्षणानुसार निदर्शनास आलेल्या गोष्टी तर निश्चितपणे धक्कादायक तर आहेतच, पण हे का घडतय याचा देखील विचार करणे आणि त्यावर वेळीच उपाययोजना करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटी काय आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत... एक साधेसरळ समीकरण. परंतु, आजची प्राथमिक विद्यार्थ्याची ही स्थिती पाहता, उद्याचा भारत सक्षम बनेल (?).

No comments:

Post a Comment