Friday 28 December 2012

मराठी अभिजात भाषा व्हावी(?)

(मी भाषाप्रेमीही नाही आणि विरोधीही नाही)
(लेख लिहिण्याआधी काही मुद्दे सविस्तर
कोणत्याही भाषेला जर अभिजात अर्थात क्लासिक भाषेचा दर्जा मिळाला, तर केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या विकासासाठी ५०० कोटी रुपये एवढा आर्थिक निधी देण्यात येतो. हा दर्जा मिळण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात, त्यापैकी एक महत्त्वाचा निकष म्हणजे ती भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असावी लागते. यापूर्वी हा दर्जा संस्कृत, तमिळ, तेलगु आणि कन्नड या चार भाषांना देण्यात आला आहे. आज मराठी, पंजाबी, बंगाली भाषिक हे या दर्जासाठी प्रयत्न करीत आहेत... त्यामुळे मी जरी इथे फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोलत असले... तरीही हे सर्वच भाषांना लागू होण्यासारखे आहे)
अभिजात भाषा अर्थात CLASSIC LANGUAGE. आजच्या घडीला मी पाहिलेले चित्र म्हणजे एकीकडे मराठी भाषेचे अभ्यासक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झटत आहेत तर दुसरीकडे मराठीप्रेमी ही भाषा टिकवण्यासाठी झगडत आहेत. मराठी अभिजात भाषा व्हावी, म्हणून मराठी भाषा अभ्यासकांनी अनेक पुरावेदेखील गोळा केले आहेत. त्यावरुन मराठी भाषा ही तब्बल २५०० वर्षे जुनी असल्याचे सिद्ध होते. त्यानुसार आता त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्राकडे शिफारसही केली आहे. (मराठीवर प्रेम, तळमळ, आस्था...हे सर्व मान्य) परंतु यापूर्वी हाच अभिजाततेचा दर्जा संस्कृत भाषेला देण्यात आला होता. त्यामुळे आपसूकच संस्कृत भाषेच्या विकासासाठी केंद्रसरकारकडून ५०० कोटींचा निधी देण्यात आला असेल(च). अजुन एक सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे, २०११च्या जनगणनेदरम्यान ’तुम्हाला ज्ञात असणाऱ्या भाषा’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्यात संस्कृत भाषेचा जरूर उल्लेख करावा, असे मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळाले. (कारण जर संस्कृत भाषा ही काही मर्यादित लोकांना माहित असेल, अथवा तिचा विस्तार कमी असेल तर त्या भाषेला मृत घोषित करण्यात येईल). त्यामुळे सर्वसामान्यांकडून संस्कृत भाषेला वाचवण्यासाठी किंबहुना तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा सर्व खटाटोप. यावर मला पडलेला स्वाभाविक प्रश्न असा की, जर अभिजाततेचा दर्जा मिळालेल्या संस्कृत भाषेच्या विकास का झाला नाही?,  त्या भाषेसाठी मंजूर झालेला विकासनिधी गेला कुठे?, संस्कृत भाषेच्या अभ्यासकांना किती शिष्यवृत्ती देण्यात आली?,  संस्कृतमध्ये नव्या साहित्याची किती निर्मिती झाली?  किंबहुना आजही शाळेत फक्त ’प्रणम्य शिरसा देवं’ आणि ’या कुंदे’ यापुरती ती मर्यादित राहिली (आत्ताची कॉन्व्हेंट पिढी असल्याने या प्रार्थनांचीही शक्यता कमीच...). मग देवांची भाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत आज देवाघरी गेली(?), असे म्हणायचे का...
भारत हा खंडप्राय देश आहे... इथे बारा कोसावर भाषा बदलते, असे म्हटले जाते. आजही संपूर्ण भारतात २२ भाषा या मान्यताप्राप्त भाषा आहेत (हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा अधिकृत आहेत). आपली राज्यघटना लिहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता (शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातील वाक्य) (टीप – मी आंबेडकरवादीही नाही आणि विरोधीही नाही). आज तिचा अनुवाद मराठीसह प्रत्येक प्रादेशिक भाषेत पाहावयास मिळतो. पण सुरुवातीलाच एक टीप तुम्हाला वाचायला मिळेल. ती म्हणजे,  सदर राज्यघटना ही वाचकांना संबंधित विषयाची माहिती करून देण्याच्या दृष्टिकोनातून असून, मूळ कायदे, नियम, तरतूदी यांच्या अचूक अर्थासाठी मूळ इंग्रजी प्रतीचा आधार घ्यावा, तोच संदर्भ अधिकृत मानला जाईल. माझ्या मते, डॉ. आंबेडकर (एक मराठी भाषिक) त्यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी इंग्रजीचा आधार का घेतला? (मराठी तर दूरच पण राष्ट्रभाषा हिंदीचा आधार का नाही?) म्हणजे जिथे तुमची राज्यघटनाच तुमच्या भाषेला प्राधान्य देत नाही मग अभिजाततेसाठी एवढे प्रयत्न का?
मराठी भाषा मुळतः सर्वांचा समावेश करुन घेणारी भाषा... (स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम हे मुलतः इंग्रजीतले). मी आत्तापर्यंत या विषयावर अनेक लोकांशी बोलले (मराठी), त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मराठी भाषा ही कधीच मरणार नाही, तिला अभिजाततेचा दर्जा मिळावयास हवा, मराठी भाषेतील साहित्यासारखे साहित्य इतर भाषेत नाही वैगरे, वैगरे अशा अनेक प्रतिक्रिया.... त्यापैकी एक प्रतिक्रिया अशी की, मराठी भाषेत वाक्याची रचना ही ठरलेली असते (कर्ता-कर्म-क्रियापद)... त्यात फक्त कर्म आपली भाषा बदलेल परंतु कर्ता आणि क्रियापद मात्र मराठी आहे ना... म्हणजे मराठी जिवंत आहे
एक उदा – मी नाश्ता केला (कर्ता - मी, कर्म – नाश्ता, क्रियापद - केला)
सध्याच्या परिस्थितीतील मराठी आणि इंग्रजीचे कॉकटेल पाहता फक्त कर्म आपली भाषा बदलेल...
मी BREAK FAST केला (कर्ता - मी, कर्म – BREAK FAST (इंग्रजाळलेल), क्रियापद - केला)
अजुन काही वर्षानंतरचे चित्र,
I Had a BREAK FAST… :P
एका सर्वेक्षणानुसार असे पाहण्यात आले की, ९३% विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमात शिकतात (भले त्यांचे पालक अशिक्षित असो). केवळ शिक्षणानंतर पाल्याला नोकरी चांगली मिळावी, हा पालकांचा उद्देश. आज इंग्रजी ज्ञानभाषा आहे... जगातील सर्व देशांना ती जोडते... ती शिकायलाचं हवी... फक्त ती शिकत असताना मराठीशी नाळ जोडली राहूदे... (इंग्रजी जर यशोदा असेल... तर मराठी ही देवकी आहे... हे विसरुन चालणार नाही)
सव्वा अकरा कोटी लोकसंख्या असलेले महाराष्ट्र राज्य... म्हणजे जवळपास कोट्यावधी मराठी भाषिक... त्यामुळे येणारे अनेक वर्षे मराठीच्या अस्तित्त्वाला धोका काही निर्माण होणार नाही... किंवा ती अशक्त ही होणार नाही... मी एक  मराठी भाषिक... एक महाराष्ट्रीयन या नात्याने कुठेतरी भावनिकदृष्ट्या मलाही वाटते, की माझ्या मातृभाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा... तिचा विकास व्हावा.  फक्त तिच्या अभिजाततेचे राजकारण नको...

No comments:

Post a Comment