Monday, 24 October 2011

मराठी शाळांतील बाकं रिकामीचं



इंग्रजी, जगातील एक प्रमुख भाषा. एक अशी भाषा जी जगात सर्वदूर पसरलेली आहे आणि जगातील अनेक देशांना जोडते, व्यवहाराची भाषा म्हणून ओळखली जाते. भारताबाबतीत विचार करता सुमारे १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजवली, भारतीय शिक्षणपध्दतीचा विकास केला. त्यामुळे अनायसे का होईना, इंग्रजांच्या बरोबरीने इंग्रजीनेही भारतीय समाजावर, संस्कृतीवर अधिराज्य गाजविले. देशाचा इतर देशांशी संपर्क वाढावा, प्रगती व्हावी म्हणून ही भाषा शिकणे अनिवार्य होऊ लागले. (आजकालच्या युगात तर ज्याला इंग्रजी बोलता येत नाही, तो जणूकाही अशिक्षितच मानला जातो, असो) जगातील अनेक देशांना जोडणारा दुवा म्हणजे इंग्रजी, हे जणूकाही समीकरणचं बनुन गेले परिणामी इतर अनेक भाषा दुर्लक्षित होऊ लागल्या.
      महाराष्ट्राचा विचार करता, इंग्रजीच्या वाढत्या स्तोमामुळे मातृभाषा मराठी ही दुर्लक्षित होऊ लागली. जगाची व्यवहाराची भाषा इंग्रजी तर आपला मुलगा मराठी माध्यमात शिकून काय उपयोग ? अशी संकल्पना पालकांच्या मनात रूजु लागली आहे. परिणामी गेल्या काही वर्षापासुन मराठी शाळांच्या पटाला गळती लागली आहे तर इंग्रजी पटावर माञ विद्यार्थीसंख्या उतु जाऊ लागली. काही वर्षापुर्वी मराठी शाळा या विद्यार्थ्यांनी भरलेल्या दिसायच्या माञ आज त्या शाळा ओस पडु लागल्या आहेत, मराठी शाळांच्या तुकड्यांची संख्या दिवसागणिक कमी होऊ लागल्या. इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल आणि कमी पटसंख्येमुळे मराठी शाळांचे होणारे एकञीकरण किंवा मान्यता नसलेल्या शाळा बंद करण्याचे सरकारचे धोरण या सर्वांमध्ये सातत्याने गळचेपी होणाऱ्या मराठी शाळांची बाके वर्षागणिक रिकामी होऊ लागली आहेत. मराठी माध्यमातुन शिक्षण घेणे हे आजकालच्या पालकांना आणि पाल्यांना डाऊनमार्केट वाटू लागले आहे. एकंदरीत याच परिस्थितीचा फायदा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतला. एकीकडे या शाळा अनेकाअनेक सवलती, सोयी-सुविधा देऊन पालकांना आणि पाल्यांना आकर्षित करू लागल्या तर दुसरीकडे माञ मराठी शाळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करताना दिसल्या. मराठी शाळांच्या या दुरावस्थेला कारणीभूत कोण ?
      सरकारी शाळांतील शे-दोनशे रूपयांची वर्गणी देण्यास कुरकुर करणारे पालक माञ इंग्रजी शाळांच्या मागणीप्रमाणे त्यांना डोनेशन देताना दिसतात. अनेक कमी उत्पन्न गटातील विद्यार्थीदेखील आज आलिशान बसमधुन इंग्रजी शाळेत जाताना दिसतो. अशी अनेक कुटुंबदेखील आहेत, की जिथे त्यांची बोलीभाषादेखील अशुध्द प्रकारे बोलली जाते परंतु त्या घरातील पाल्य माञ इंग्रजी माध्यमात शिकताना दिसते. अनेक पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य इंग्रजीवाचुन अंधारात दिसते. मुलांच्या उज्वल भविष्याकडे जाणारा मार्ग हा इंग्रजीच्या दारातुन जातो अशी अंधश्रध्दा समाजात रूढ होऊ लागली आणि शहरातुन तालुक्यांपर्यंत पोहचलेली इंग्रजीचे खुळ आता खेडेगावातही दिसु लागले आहे.
      जगातील अनेक प्रगतशील देशांपैकी चीन, जपान यांसारख्या अनेक देशांमध्ये शिक्षण हे मातृभाषेतुनच दिले जाते, या देशांच्या विकासाची गती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. इंग्रजी माध्यमातील शिक्षणाविना त्यांच काही फारस अडलेलं दिसत नाही. मग अनेक भाषांनी समृध्द असलेल्या आपल्या भारत देशात इंग्रजीचा अट्टहास का ?
      २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे सव्वा अकरा कोटी लोकसंख्या असलेले आपले महाराष्ट्र राज्य. मग एवढ्या मोठया मराठी मुलुखातील मराठी शाळांवर ही परिस्थिती ओढवावी, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. मुद्दा फक्त मराठीचा नाही, मातृभाषेतुन शिक्षण देण्याबाबत जगातील सर्व भाषातज्ञांचे व शिक्षणतज्ञांचे एकमत आहे, मग आपणच या बाबतीत उदासीन का ? कदाचित यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासुन विचारवंत मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी चिंता करताना दिसतात. परिणामी जर हिच परिस्थिती राहीली तर मराठी भाषा टिकेल का ? या प्रश्नावर आता सर्वांनी विचार करायला हवा.

1 comment:

  1. marathi shaletil mule hi khup shikum mothe padvidhar hotat pan...aata english alyamule direct english shiktat....

    ReplyDelete