Tuesday, 27 September 2011

बदलणारे नातेसंबंध


काही दिवसांपुर्वी एका नातवाने आजी आपल्याला बाईक घेउन देत नाही या क्षुल्लक कारणावरुन आपल्या आजीचा खुन केला आणि याहुनही कहर म्हणजे आपल्या आईचा खुन आपल्याच मुलाने केला आहे हे माहीत असुनही पंकज मेहता यांनी पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षभराचे सर्वेक्षण पाहता वृध्दांच्या हत्येमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन येते आणि कित्येकदा हत्या करणारी व्यक्ती ही त्यांची निकटवर्तीयच असल्याचे दिसुन येते. यावरुन आजकालचे नातेसंबंध कसे बदलत चालले आहेत याची कल्पना येते.
वृध्दांच्या होणाऱ्या हत्यांवरून वृध्द माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. खरचं ती सुरक्षित आहेत का ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. वृध्दांच्या सुरक्षेसाठी शासनाने हेल्पलाईन जरी सुरू केलेली असली तरीही कुंपणचं जर शेत खात असेल तर हेल्पलाईनचा तरी काय उपयोग? यावरून आजकालची पिढी आणि वृध्द माणसे यांच्या नात्यातील पोकळपणा दिसुन येतो.
पुर्वीच्या काळात एकञ कुटुंबपध्दती होती, आजी-आजोबा या संकल्पनेला फार महत्व होते. त्यांच्या सहवासात मुलांना नातेसंबंध जपण्याची शिकवण मिळत असे, त्यांच्यावर संस्कार घडत असत, आपलेपणा, जिव्हाळा या गोष्टींची त्यांना जाणीव होत असे. माञ काळाच्या ओघात त्या संकल्पनेला तडा जाऊन विभक्त कुटुंबपध्दती रुळली गेली. हम दो हमारे दो ही जणूकाही कुटुंबाची व्याख्या बनुन गेली आणि त्याच ब्रीदवाक्याला अनुसरून कालांतराने आजी-आजोबांची रवानगी वृध्दाश्रमात करण्यात येऊ लागली. एकंदरीत पाहता आजकालची मुल्यव्यवस्था कशी ढासळत चालली आहे याचा प्रत्यय येतो.

No comments:

Post a Comment